Biography
श्री शंकर महाराज
जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७
Shankar Maharaj
श्री शंकर महाराज
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही.
जन्म व पूर्व इतिहास
त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो!’ नावही ‘शंकर’! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’
ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते!